औरंगाबाद - महापुरुषांच्या नावाने कर्जमाफी जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला. शिवसेनेने सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते ते पाळावे असेही सूर्यवंशी म्हणाले. तसेच यावेळी सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली.
शेतकरी कर्जमाफीबाबत आलेल्या जीआरची शेतकऱ्यांनी होळी केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला. 2006 नंतर कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने फसवी कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. सरकारने महापुरुषांचा आणि शेतकऱ्यांचा अवमान केल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला.
राज्यात नवीन समीकरणे घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. नव्या सरकारने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हाती घेत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. कुठल्याही अटी न लावता २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार अशी घोषणा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, कर्जमाफीबाबत जीआर समोर आला असून 2015 ते 2019 या काळातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असल्याचे दिसून आल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला.
पैठण तालुक्यात जयाजी सूर्यवंशी यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी जीआरची होळी केली. तसेच सरकारचा निषेध केला. 2006 मध्ये कृषीमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यानंतरच्या कर्जमाफीत निर्णय घेतला जाईल, अशी आशा होती मात्र तस झालं नाही. नव्या सरकारने आमची निराशा केली असल्याची खंत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने ज्याप्रमाने बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी जयाजी सूर्यवंशी यांनी केली.