औरंगाबाद - कन्नड तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला. मका, सोयाबीन, कापसासह फळबागाला या पावसाचा मोठा फटका बसला. शासनाकडून मदतीची घोषणा झाली. मात्र, अद्यापही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. त्यांनीही मदतीसह संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अजून कोणतीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनानंतरच राज्याला मिळणार 'उपमुख्यमंत्री'
दुसरीकडे शेतकऱ्यांवर झालेले आघात विसरून शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. कितीही संकटं आले तरी शेतकऱ्याला घरखर्च चुकला नाही. मुलाबाळांचे शिक्षण, आजार, शेती खर्च करावाच लागतो. या विवंचनेतून शेतकरी वर्ग पुन्हा शेतात मोठ्या आशेने रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.
दरम्यान, यावर्षी झालेल्या पावसाने कन्नड परिसरातील नदी, नाले, धरणे, तलाव व विहिरी भरल्या असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही. रब्बी हंगामात सहसा शेतकऱ्यांचा गहू पिकाकडे ओढा असतो. मात्र, खरिपात मका पिकावर पडलेली लष्करी अळी व त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे मका पिकाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच कांदा टोमॅटोचेही भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी गहू पिकाऐवजी मका, कांदा, टोमॅटो यासारख्या पिकांना पसंती दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मका, टोमॅटो व कांदा पिकांचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
सध्या मका पिकाची शासकीय भरड धान्य योजनेतून हमी भावाने शासनाकडून खरेदीची सुरुवात झाली नाही. संबंधित खरेदी सुरू झाल्यावर मका पिकाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मक्याला एक हजार ते 1 हजार 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
सध्या उन्हाळी कांद्याचे भाव 70 ते 100 रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्याने शेतकरी आनंदात आहेत. मात्र, सध्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीचा कांदा शिल्लक असल्याची शक्यता कमीच आहे. मात्र, पुढील हंगामात कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी उशिरा कांदा रोपे तयार करताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळे बळीराजा भूतकाळातील आपले दुःख बाजूला सारून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे.