औरंगाबाद - लासुर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याचे लिलाव सुरू झाले आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन येत असतात. सोमवारी मार्केटमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडून लिलावामध्ये कांदा कमी दराने खरेदी केल्या जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत कार्यालयासमोर ठिय्या दिला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याने काही काळ लिलाव ठप्प झाले होते. यावेळी माजी बांधकाम सभापती संतोष जाधव व बाजार समितीचे सचिव कचरू रणयेवले यांच्या मध्यस्थीने कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.
कमी दराने कांदा खरेदी करत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप
घोडेगाव, अहमदनगर,वांबोरी, लासलगाव, नाशिक येथील कांद्याच्या दरानुसार 300ते 500 रुपये प्रति क्विंटल कमी दराने कांदा खरेदी करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. यावेळी बाहेरील व्यापारी कांदा जादा दराने खरेदी करत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी कांदा घेणे बंद केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप करत कांदा लिलाव बंद पाडले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश दिंडे, कॉन्स्टेबल दादाराव तिडके घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, परिस्थिती निवळल्याने दुपारनंतर कांदा चांगल्या दराने खरेदीस सुरवात झाल्याने कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.
हेही वाचा - आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार