औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील टुणकी येथील शेतकऱ्याने गावाजवळील नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (दि. २९) ला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आप्पासाहेब धोंडिराम पवार (वय-40), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संबंधित घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आप्पासाहेब यांना नदीपात्रातून बाहेर काढले. यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे.
हेही वाचा परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान, भाऊबीजेच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या
सततची नापिकी तसेच वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी कुटुंबियांना यापूर्वीच सांगितले होते. भाऊबीजेच्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. पवार यांचा मोठ्या भावाचे याआधी अपघाती निधन झाले होते. यामुळे पवार कुटुंबियांना धक्का बसला आहे.