औरंगाबाद - राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी म्हणावा तसा उपयुक्त दिसून येत नाही. तसेच हा अर्थसंकल्प काही विशिष्ट भागातील शेतकऱ्यांसाठी मांडला गेला असल्याचा भास होत असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला.
शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी निर्यात धोरण ठरवले तर शेतकऱ्यांना मदत होईल. मात्र, तस होत नाही. या अर्थसंकल्पात काही तरतूद होईल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. काही गोष्टी चांगल्या आहेत, त्यामुळे हा अर्थसंकल्प इतका चांगला नाही आणि वाईट देखील नाही, असे म्हणावे लागेल असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या अर्थसंकल्पात तस दिसले नाही. शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन अनुदान चांगला निर्णय आहे. मात्र ते सर्व शेतकऱ्यांना द्यायला हवे होते. मराठवाड्यातील तूर, कापूस डाळ यांना चांगले अनुदान देणे अपेक्षित होत. मात्र तस झाले नाही. एक लाख सौर ऊर्जा पंप देण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, विम्याच्या बाबतीत काही तरतुदी आवश्यक होत्या.
विम्यात वन्यजीव प्राण्यांनी केलेल्या नुकसान मिळणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात वनव्याने बागा जळतात त्या देखील विम्यात असणे गरजेचे आहे. या तरतुदी आवश्यक असल्याचे मत शेतकरी नेते सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळतात, असे म्हणतात. मात्र, अर्थसंकल्पात तसे होताना दिसत नाही. अर्थसंकल्प पाहता पुणे, सोलापूर, कोल्हापूर, कोकण या भागापूरता मर्यादित असल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.
हेही वाचा - 'कोरोना'च्या भीतीने मुलांनी मारली शाळेला दांडी; औरंगाबादेतील प्रकार