कन्नड(औरंगाबाद) - कन्नड़ तालुक्यातील शफेपूर येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नागेश्वर महादू दवंगे (४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. उसने घेतलेल्या पैशाची परतफेड करण्याच्या चिंतेतून त्याने विष पिऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरप यांनी दिलेल्या माहितीनुसार , गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शफेपुर शिवारातील नागेश्वर महादू दवंगे (४१) हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.धीरज पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला, तिथे शवविच्छेदन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दवंगे हे चिंताग्रस्त होते, नातेवाईक व काही मित्रांकडून त्यांनी शेतीच्या कामासाठी हातउसने घेतलेले पैसे कसे द्यावे, याची त्यांना चिंता लागलेली होती, असे नातेवाईकांनी सांगितले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.