औरंगाबाद- येथील कन्नड तालुक्यातील आठेगाव येथे ३२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. सुदर्शन पांडुरंग वाळुंजे, असे शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातील राहत्या घरात दोराने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा- 'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
काल (गुरुवारी) सकाळी सुदर्शन वाळुंजे यांची पत्नी सकाळी कापूस वेचणीसाठी शेतात गेली होती. त्यावेळी घरात कुणीच नसल्याने घरातील पत्र्याच्या लोखंडी गजाला त्यांनी गळफास लावला. यावेळी त्यांच्या एका नातेवाईकांनी घरात डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यात कळताच जमादार मनोज घोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित मृतदेह तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.