छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) : आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच रब्बीतून काही तरी हातात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी खचून गेला आहे. गंगापुर तालुक्यातील वायगाव येथील शेतकऱ्यांने घरात पडून असलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने चिंतेत होता. तसेच दोन ते तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मित्र नातेवाईकाकडून घेतलेले पैसे फेडायचे कसे या चिंतेतून शेतकऱ्याने शेतातील आत्महत्या केली आहे.
शेती नुकसानीचा फटका: याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक शिरसाट यांनी शेतात कापूस पिकाची लागवड केली होती. भाव वाढीच्या आशेने त्यांनी घरातच कापूस ठेवला होता. मात्र कापसाचे दर कमी होत असल्याने ते नेहमी चिंतेत असायचे, त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे पैसे कसे फेडावे याची त्यांना चिंता लागली होती. कापसाचे कमी झालेले दर अशातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गहू, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा त्यांनी धसका घेतला होता.
शेतात केली आत्महत्या: कापसाला दर मिळेना त्यातच अवकाळी पावसाने गहू कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी 8 मार्च रोजी रात्री घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. रात्रभर त्यांचा शोध घेण्यात आला. सकाळी अशोक शिरसाट यांचे चुलत भाऊ मच्छिंद्र शिरसाट शेतात गेल्यावर त्यांना शेतात अशोक शिरसाट यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती त्यांनी नातेवाईकांना दिली.
बळीराजासाठी घोषणा: शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. अवकाळी पाऊस, नापिकी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, बजेटमध्ये बळीराजासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: Student Suicide परीक्षेच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या कुटुंबाला मानसिक धक्का