औरंगाबाद - महाराष्ट्राच्या वाटेचे ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा घाट भाजप सरकारने घातल्याचा आरोप नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. हे पाणी गुजरातला दिले तर महाराष्ट्राची परिस्थिती अधिक भीषण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
गुजरातला पाणी देण्याचे प्रस्तावित केले असून याबाबत विधानसभेची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. माजी आमदार नितीन भोसले यांनी जनजागृतीसाठी पाणी यात्रा काढली आहे.
गोदावरी खोरे लवादापुढे गुजरातला पाणी देण्याविषयी काही म्हटले गेलेले नाही. महाराष्ट्राला अंधारात ठेवून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गुजरातला पाणी देऊ पाहत आहेत. नार पार आणि दमणगंगा खोऱयातील पाणी गुजरातला दिले जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख, प्रधान सचिवांनी गेल्या १ एप्रिलला आपणास पाठवलेल्या पत्रात केला आहे. नाशिकच्या पश्चिम टापूत पडणारे पाणी महाराष्ट्राचे, धरणासाठी जमीन महाराष्ट्राची, धरणग्रस्त महाराष्ट्राचे, पाणी मात्र गुजरातचे अशी परिस्थिती आहे. दुष्काळ दौऱयावर असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी गुजरातला दिल्या जात असलेल्या पाण्याला विरोध करावा, असे आवाहन भोसले यांनी केले.
२० जुलै २०१७ ला मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण्याची परवानगी केंद्र सरकारला दिली असल्याचे पत्र दिले आहे. केंद्राच्या दबावाखाली येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप भोसले यांनी केला. गुजरातला दिले जाणारे हे पाणी थांबवून, त्यासंदर्भातील करार रद्द करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी दिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.
गोदावरील व गिरणा यातील उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हे पाणी दिल्यास परिसरातील दुष्काळ संपुष्टात येईल. परंतु विद्यमान सरकार आघाडी सरकारच्या काळातील या कराराचा उल्लेख करीत गुजरातला पाणी देत आहे, असेही भोसले यांनी सांगितले.