छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पर्यटनाची राजधानी समजली जाते. येथील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता गेल्या काही वर्षांपासून वेरूळ अजिंठा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र मागील सात वर्षांमध्ये काही ना काही कारणांनी महोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी महोत्सवाचे आयोजन जी 20 परिषदेच्या निमित्ताने करण्यात आले. तीन दिवसीय महोत्सवात वेगवेगळ्या कलाकारांची कला अनुभवता येणार आहे. पहिल्या दिवशी मयूर वैद्य यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, प्रार्थना बेहेरे यांनी भारतीय नृत्य आविष्कार सादर केले. त्याच बरोबर पद्मभूषण रशीद खान, महेश काळे यांचे गायन, तर पद्मश्री विजय घाटे आणि पं राकेश चौरसिया यांची तबला आणि बासरी जुगलबंदी सादर करण्यात आली. पुढील दोन दिवस अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
जी 20 सदस्य झाले दाखल : संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा डब्ल्यू 20 च्या अध्यक्षस्थानी आहेत. समूहातील इतर प्रतिष्ठित भारतीय प्रतिनिधींमध्ये 5 व्या राजस्थान वित्त आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉ. ज्योती किरण शुक्ला, पंतप्रधानांच्या आर्थिक परिषदेच्या सदस्य प्रा. शमिका रवी, भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी भारती घोष, अभिनेत्री रवीना टंडन, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज तसेच उद्योजक आणि डब्ल्यू 20 सचिवालयाच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांचा समावेश आहे.
महोत्सव पाहण्यासाठी विदेशी पाहुणे : डब्ल्यू 20 मध्ये 19 देश आणि युरोपिय महासंघाचे अंदाजे 100 प्रतिनिधी आहेत. यातील काही सदस्य शनिवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विमानतळ येथे स्वागत केले. त्यानंतर हे विदेशी पाहुणे वेरूळ अजिंठा महोत्सव पाहण्यासाठी सोनेरी महाल येथे दाखल झाले. त्यांनी महोत्सवाचा आनंद घेतला. अजिंठा वेरूळ महोत्सव हा सात वर्षांनंतर पार पडत आहे.
कशी झाली महोत्सवाची सुरूवात : औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात करण्यात आली होती. या महोत्सवाचे रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले होते. अजिंठा वेरूळ महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागच्या काही दिवसांत विविध कारणांमुळे हा महोत्सव होऊ शकला नाही.