मुंबई - मोबाईल हा मानवाच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा घरी बसून मागवायची असेल तर मोबाईलशिवाय पर्याय नाही. मात्र, मोबाईल बिघडला किंवा रिचार्ज करायचा असेल तर काय करायचे? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, मोबाईल दुकानांना अद्याप ही परवानगी नाही. त्यामुळे मोबाईल दुकाने आणि सर्व्हिस सेंटर बंद आहेत. यामुळे राज्यातील मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या तांत्रिकी कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मोबाईल अत्यावश्यक असला तरी लॉकडाऊनमुळे लोकांना सेवा देता येत नाहीये, त्यामुळे परिस्थिती बिकट होत असल्याचे मत मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. याचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
या लॉकडाऊन काळामध्ये मोबाईल आपला सहारा बनला आहे. डिजीटलच्या जमान्यात अनेक कामांसाठी मोबाईलवर अलंबलून रहावे लागते. लॉकडाऊनमध्ये माझा मोबाईल खराब झाला होता. मी अनेक ठिकाणी संपर्क केला मात्र, सगळीकडे दुकाने आणि सेवा बंद होती. शेवटी पनवेलला एका ठिकाणी मदत मिळाली मात्र, त्यासाठी कामोठे ते पनवेल चालत जावे लागले. जर जवळ दुकान सुरू असते तर मला एवढी पायपीट करावी लागली नसती, असे उदय गायकवाड यांनी सांगितले.
औरंगाबादेत मोबाईल सर्व्हिस सेंटर बंद असल्याने ग्राहकांची तारांबळ
मोबाईल आता आपल्या जीवनाचा आवश्यक असा घटक म्हणता येईल. मोबाईल खराब झाला तरी आपले खूप मोठे नुकसान झाल्याचा अनुभव सर्वांना येतो. त्यात आता लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मोबाईल समस्या उद्भवत आहेत. त्याची दुरुस्ती कोण आणि कुठे करतो ते माहिती जरी असले तरी मात्र दुरुस्ती शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण हताश झाले आहेत. अशा काळात मोबाईल दुरुस्ती करायला हरकत नाही. मात्र, सरकारने दिलेल्या सुचनांमुळे ते करता येत नसल्याचे मोबाईल कंपनीच्या अधिकृत दुरुस्ती सेवा देणाऱ्या आकाश कारके यांनी सांगितले.
आकाश कारके यांचे औरंगाबादच्या सिडको भागातील कॅनॉट येथे मोबाईल दुरुस्तीचे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे. जवळपास तीन ते चार कंपन्यांचे मोबाईल ते दुरुस्त करतात. त्यांच्याकडे पाच जण काम करतात. चार जण मोबाईल दुरुस्ती आणि एक जण मदतनीस म्हणून काम करतो. लॉकडाऊन झाल्यापासून सर्व काम त्यांना बंद करावे लागले. मोबाईल दुरुस्ती बाबत अनेकजण संपर्क करत आहेत मात्र त्यांना सेवा देणे शक्य होत नाहीये, असे मत आकाश यांनी व्यक्त केले.
मोबाईल प्रत्येकासाठी महत्वाचा झाला आहे. काही जणांचे मोबाईल दुरुस्तीसाठी आणून दिले होते. मात्र, अचानक सर्व बंद झाल्याने त्यांना ते दुरुस्त करून देणे शक्य झाले नाही, तर काही जणांचे मोबाईल खराब झाले. त्यामुळे त्यांना अडचण झाली असून मोबाईल दुरुस्त करून द्या, अशी विनंती केली जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे मदत करणे शक्य होत नाही. ग्राहकांना सेवा देता येत नाही, त्यात खर्च भागवणेदेखील अवघड झाले आहे. कॅनॉटसारख्या भागात असलेल्या जागेचे महागडे भाडे कसे द्यायचे. आपल्याकडे असलेल्या लोकांची पगार कशी करावी, त्यात आता काम सुरू होणार तरी कधी असे असे अनेक प्रश्न आकाशला पडले आहेत. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती केंद्रांना जर नियम अटींना अधीन राहून परवानगी द्यायला हवी. जेणेकरून ग्राहकांना सेवा देणे शक्य होईल आणि लागणारा खर्च काढणेदेखील सोपे होईल, असे मत आकाश कारकेने व्यक्त केले.