औरंगाबाद - कोरोना संकटामुळे अनेक व्यवसाय तसेच उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शहरातील ड्रायक्लिनर्स(धोबी) व्यावसायिकांच्या धंद्यात ५० ते ६० टक्क्याने घट आल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. पारंपरिक आणि आधुनिक यंत्राचा वापर करून शहरात २५० ते ३०० व्यावसायिक कपडे धुण्याचा आणि इस्त्री करण्याचा व्यवसाय करतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहक या व्यावसायिकांकडे कपडे देण्यास घाबरत आहेत. परिणामी धोबी व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.
शहरात साधारणपणे २५० ते ३०० ड्रायक्लिनर्स व्यावसायिक आहेत. त्यातील २० टक्के व्यावसायिक घरूनच व्यवसाय करतात. यातील काहींचा तर पिढ्यान पिढ्या हाच व्यवसाय आहे. २००२ पर्यंत पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय होत होता. धोबी घाटावर २० हौदांची व्यवस्था होती. एक व्यावसायिक एका हौदाचा वापर करत असे. एका व्यावसायिकाकडे साधारण ४० ते ५० घरचे कपडे धुण्यासाठी येत असत. कोणत्या घरचे कपडे आहेत, हे ओळखण्यासाठी कपड्यांवर विशिष्ट प्रकारची खुण करण्यात येत असे. कालांतराने कपडे धुण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात येऊ लागला.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे धोबी व्यवसायात ६० टक्क्यांच्या वर घट झाली. व्यवसाय कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती सध्या या व्यवसायाची आहे. ४० ते ५० घरातून येणाऱ्या कपड्यांचे प्रमाण आता १० ते १२ घरांवर आले आहे. कपडे धुण्यासाठी आल्यानंतर त्यांना व्यवस्थित सॅनिटाईज करणे, नंतर त्याला गरम पाण्यात भिजत घालणे, अशी सध्याची कपडे धुण्याची पद्धत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा खर्च वाढला आहे मात्र, ग्राहक जास्त पैसे देण्यास तयार नाही. चार महिन्यांचे लाईट बिलही विद्युत कंपनीने पाठवले आहे. कमी वापर असून अनेकांना जास्त बिल आले आहे. त्यामुळे सरकारने धोबी व्यावसायिकांचे लाईट बिल माफ करावी, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.
लॉकडाऊनपूर्वी स्पर्धा परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी यांचेही कपडे जास्त प्रमाणात येत होते. आता कोरोनामुळे हे विद्यार्थी आपापल्या गावाकडे गेल्याने व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला आहे. अनेक मोठे हॉटेल आणि दवाखान्यांनीसुद्धा आता कपडे स्वच्छ करण्यासाठी स्वतःची यंत्र सामुग्री आणली आहे, त्याचाही परिणाम व्यवसायावर झाला आहे, असे परिट-धोबी सेवा मंडळाचे प्रदेश सचिव रामनाथ बोरूडे यांनी सांगितले.
पांढऱ्या कापड्यांसाठी विशिष्ट भट्टी -
90 च्या दशकात लोकांमध्ये पांढरे कपडे वापरण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे धुण्यासाठी पांढरे कपडे जास्त प्रमाणात येत. तेव्हा ते कपडे एका विशिष्ट भट्टीवर धुतल्या जात. ८० ते १०० कपडे बसतील अशा तांब्याच्या भांड्यात सोडा आणि निळ टाकून कपडे भिजवले जात, त्यानंतर त्या भांड्याला जळत्या चुलीवर ठेऊन वाफेच्या भट्टीवर कपडे धुतले जात. पूर्वी २० हौदावर २० भट्टया चालत असत. परंतु आता या भट्ट्यांची जागा आधुनिक यंत्रांनी घेतल्याची माहिती व्यावसायिक शिवाजी बाबुराव लिंगायत यांनी दिली.