औरंगाबाद - सरकारच्या 22 मंत्रांच्या नावावर काहीना काही तक्रारी आहेत. त्याबाबत पुरावे देण्यात आले असूनही मुख्यमंत्री मात्र, या मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचे एकच काम वारंवार करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
शिक्षण घेताना पदवी सोबतच बेरोजगारीचे प्रमाणपत्र देखील महाराष्ट्रातील युवकांना मिळत असते. त्यामुळे गावातील सुशिक्षित बेरोजगार नाक्यावर नोकरीसाठी उभे राहतात. तर, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री राज्य वाऱ्यावर सोडून यात्रा कशी करु शकतात? आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी यात्रा कशा काढतात तुमच्या ठिकाणी? अशा यात्रा आल्या तर त्या आडवा आणि त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना केले.
पुढे बोलताना, कुठे गेला चिक्की घोटाळा, कुठे गेला मोबाईल, राज्यातील जनता आता यांना विचारणार कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?, असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला. रयतेचे राज्य यावे म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली होती. पण, पुरामुळे पहिला टप्पा थांबवला, असे डॉ. कोल्हे यांनी सभेत बोलताना सांगितले.
ज्या पक्षात नेते महाराजांचे नाव घेऊन पुढे जात आहात, त्या महाराजांची ते शिकवण विसरलेत. अडचणीच्या काळात मंत्री जनतेला सोडून जात नसतात, यात्रा काढून काय होणार? तेथे सरकारचे मंत्री सेल्फी काढत बसले. चंद्रकांत पाटील तर प्रश्न विचारणाऱ्याला 'गप्प ऐ' म्हणतात, जनतेवरील कठीण परिस्थितीत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वन केले पाहिजे, मात्र येथे दडपशाही सुरू आहे, असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला.