औरंगाबाद- शहरात प्रस्तावित असलेले बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे टेंडर कोणी भरू नये. त्याला आमचा विरोध असणार आहे. आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
स्मारकांवर पैसे खर्च करण्याऐवजी त्या पैशांने चांगल्या शिक्षण संस्था, रुग्णालये उभी करा आणि त्यांना त्या नेत्यांची नावे द्या, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. त्याचबरोबर, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात मनपा निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. निवडणुकीत होणाऱ्या सभांमध्ये लोक जमतील यामुळे त्यांना कोरोना आजार होण्याची शक्यता आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमावा, अशी मागणीही खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यास आमचा विरोध
शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी अनेक विभागाला पत्र दिले आहे. त्याचे एनओसी घेतले जात आहे. एका विभागाचे नाहरकत मिळवण्याची जबाबदारी तहसीलदार यांना दिली आहे. पण, शहराचे नाव बदलण्यास आमचा विरोध असेल. मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार शहराचे नाव बदलत असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला.
हेही वाचा- 'डेक्कन एक्सप्रेस' नव्या अवतारात... प्रवास होणार अधिक आरामदायी