औरंगाबाद - कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरने रुग्णावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या पदमपुरा कोरोना सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी मध्यरात्री एका आयुष डॉक्टरने कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या महिला रुग्णाचा नंबर घेऊन डॉक्टर अवेळी फोन करत असल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. डिस्चार्ज करण्याचे आमिष दाखवून डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोधकरत आरडाओरड केली. त्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ उडाला. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टराला मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली.
डिस्चार्जचे आमिष दाखवून केली शरीरसुखाची मागणी -
आरोपी डॉक्टरने महिलेला डिस्चार्ज देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी केली होती. महिलेने याला नकार दिल्याने त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची कल्पना महिलेने कुटुंबीयांना दिल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, नातवाईकांनी पालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने चौकशी सुरू केली. या घटनेचा चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिली.