गंगापूर(औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सांडपाण्यावरून झालेल्या वादातून ( Dispute Over The Waste Water ) थेट एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची घटना 13 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असून, 15 डिसेंबर रोजी रात्री याप्रकरणी तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered Against Three Accused In Firing ) आहे.
दोन अजूनही फरार : या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दोन जण अजूनही फरार आहेत. राहूल ज्ञानेश्वर वालतुरे (वय 30 वर्षे) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हरी ऊर्फ हरीश विठ्ठल वालतुरे ( वय 34, रा. नेवरगाव ) असे गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल तुरे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी कट्ट्यातून गोळीबार : याप्रकरणी राहुल ज्ञानेश्वर वालतुरे यांनी गंगापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी आरोपी हरी वालतुरे आणि त्यांच्यात सांडपाण्यावरून वाद झाला होता. रस्त्यावर पाणी सोडू नको, आम्हाला जाण्या-येण्यास त्रास होतो, असे राहुल यांनी आरोपी हरीला समजावून सांगत असताना त्याने राहुल यांना मारहाण करून शिवीगाळ केली. वाद वाढत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी दोघांचे भांडण सोडविले. त्याच दिवशी अकरा वाजता रात्री गावातील चौकात दुकानात बसलेले असताना आरोपी हरीश दुचाकीवरून त्याच्या दोन साथीदारासह आपल्या जवळ आला व त्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली . राहुलच्या फिर्यादीवरून आरोपी हरीश वालतुरे व त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शकील शेख ही करत आहे.