औरंगाबाद - कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर कन्नड नगरपरिषदेने कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरात निर्जंतुकीकरण फवारणीची मोहीम हाती घेतली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील रस्त्यावर औषध फवारणी सुरू केली आहे. आतापर्यंत 11 प्रभाग पूर्ण करुन दुसऱ्या टप्प्यातील फवारणीला सुरूवात करण्यात आली आहे. मुख्य रस्ता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व मुख्य बाजार पेठ, क्रिर्डी संकुल, भाजी मंडी आदि भागात रस्त्यावर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच, शासकीय इमारती निर्जंतुकीकरण करण्यासाठीही नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.
गेल्या 10 दिवसांपासून शहरातील रस्त्यावर सोडीयम हाइपोक्लोराइट औषधाची फवारणी केली जात आहे. ही फवारणी शहरातील 3 विभागात टप्याटप्याने करण्यात आली. यात उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती यांचे सहकार्य मिळत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले.