औरंगाबाद - मराठवाड्याचा पाणी प्रश्न आम्ही जवळपास सोडवला आहे. तसेच जलयुक्त शिवार योजना ही जनतेच्या मनातली आहे. त्यामुळे ती बंद करु नका. विभागाला पाणी मिळाले नाही, तर आज उपोषण आहे. उद्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ सिंचन नसल्याने होत आहेत. मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे. आपल्या आधी 15 वर्षे आघाडी सरकार होते, त्यावेळी मराठवाड्यावर अन्याय झाला. एक थेंबही हक्काचे पाणी दिले नाही. गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी आश्वासन दिले होते. मात्र, सर्व पाणी पश्चिम महाराष्ट्रात वळवले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कृष्णा खोऱ्यातून मराठवाडा योजनेला पाणी देण्यासाठी 4 हजार कोटी आमच्या सरकारने दिले. काम अंतिम टप्प्यात आहे मात्र, आम्हाला भीती आहे की काम बंद होईल, यासाठी पंकजा मुंडे उपोषणाला बसल्या आहेत. हक्कचे पाणी वळवाल तर खबरदार. जनतेच्या मनातील जलयुक्त शिवार योजना आहे. तीच नाव बदलायचे असेल तर बदला. मात्र, योजना सुरू ठेवा, असे फडणवीस म्हणाले.
कोकणाच्या समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणायचे आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर करायचा आमचा विचार होता. आताच्या सरकारने काम पूर्ण करावे. वॉटर ग्रीडमुळे अनेक जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागले असते. मात्र, तो देखील प्रकल्प स्थगित केला गेला. टेंडर देण्यावरून वाद आहे. टेंडर कोणालाही द्या, मात्र काम सुरू करा, अशी टीका फडणवीस यांनी केली.