औरंगाबाद : आदर्श बँकेत असलेल्या ठेवीदारांना अद्याप पैसे परत कधी मिळणार याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात ठेवीदार बँकेसमोर येऊन बसत आहेत. काही ना काही उत्तर मिळेल, या अपेक्षेने सगळे खातेदार आस लावून बसले आहेत. मात्र त्यांना उत्तर मिळत नाही. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसात अधिवेशनात पैसे कधी मिळणार हे स्पष्ट करा, अन्यथा आम्ही आंदोलन सुरू करू असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
पायाच्या उपचारासाठी मालकर बँकेसमोर बसून : आदर्श नागरी पतसंस्थेच्या सिडको येथील बँकेसमोर नामदेव मालकर नावाचे ठेवीदार रोज येऊन बसत आहेत. त्यांच्या पायाला दुखापत असल्याने तातडीने उपचार घेणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. मात्र बँकेत असलेली ठेव मिळत नसल्याने, त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. नामदेव मालकर मोलमजुरी करत होते, आयुष्याची जमापुंजी त्यांनी बँकेत जमा केली. इतकेच नाही तर आपले राहते घर त्यांनी विकले आणि त्याचे पैसे देखील बँकेत ठेव म्हणून ठेवले. आज त्यांच्या पायाचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी त्यांना दीड ते दोन लाखांची गरज निर्माण झाली आहे. बँकेत जवळपास सहा ते सात लाख रुपये असूनही त्यांना ते मिळत नाहीत. त्यामुळे आता उपचार करावे कसे असा प्रश्न नामदेव मालकर या खातेदाराला पडला आहे.
सेवानिवृत्त नागरिक आले अडचणीत : आदर्श बँकेद्वारे वेगवेगळ्या आकर्षक योजना ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यात एका वर्षाची ठेव ठेवल्यास त्यावर १२ ते १३ टक्के इतका व्याजदर देण्याचे आश्वासन बँकेने दिले होते. राष्ट्रीयकृत बँकेत सहा ते सात टक्के इतके व्याज मिळत असताना, पतसंस्थेत अधिक व्याज मिळत असल्याने अनेक सेवानिवृत्त नागरिकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी आदर्श संस्थेत ठेवली. अनेकांच्या ठेवींची मुदत देखील पूर्ण झाली आहे. मात्र त्यांना ते पैसे मिळत नाहीत. म्हातारपणाची सोय म्हणून केलेली उपाययोजना मात्र आता कामी येत नाही. त्यामुळे आम्ही काय करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यात बँकेसमोर महावितरणमध्ये काम करणारे आसाराम घुगे यांनी आपली व्यथा मांडली. हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून, दर महिन्याला तीन ते चार हजार रुपये औषधासाठी लागतात. ठेवीवरील व्याज मिळत होते, त्यामुळे औषधांची सोय होत होती. मात्र आता पैसे मिळत नसल्याने उपचार घ्यायचा कसा अशी व्यथा घुगे यांनी मांडली.
बँकेचे संचालक अटकेत मात्र उपयोग नाही : बँकेच्या संचालक मंडळांपैकी अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर इतर चार जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 25 जुलै पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. असे असले तरी बँकेतील ठेवी परत कधी मिळणार, हे मात्र अद्याप कळलेले नाही. त्यामुळे खातेदार त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर पतसंस्थेच्या नियमानुसार जास्तीतजास्त पन्नास लाखांचे कर्ज आदर्श पतसंस्थेला देता येते. असे असले तरी संस्थेने कोटींचे कर्ज वाटप केले. त्यामुळे आता खातेदारांचे पैसे परत मिळणार कसे आणि त्यासाठी सरकार नेमकी काय उपाययोजना करणार, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -