छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून इतरांना पैशांची मागणी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र यातून पोलीस अधिकारी देखील बचावले नसल्याचे जिल्ह्यात समोर आले. महिला पोलीस अधीक्षकाच्या नावाने बनावट खाते तयार करत, त्यात असलेल्या मित्रांना पैशाची मागणी केली गेली. इतरांना फसवेगिरी बाबत आवाहन करणाऱ्या पोलिसांच्याच मित्रांनी मात्र, पुढचा मागचा विचार न करता पैसेही देऊन टाकले. मात्र काही दिवसातच हा बनाव उघड झाला आणि ते अकाउंट बंद करण्यात आले. मात्र संरक्षण करणारे पोलीसच जर फसवले जात असतील तर, सामान्यांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो.
महिला पोलिस अधीक्षकाच्या नावाने फसवणूक : लोहमार्ग पोलिस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर कोणी तरी बनावट खाते तयार केले. त्याच्या माध्यमातून मुलीला वैद्यकीय मदतीसाठी पैश्यांची गरज असून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. मदतीसाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड देण्यात आला. त्यावर पोलीस अधिकारी अशी मदत मागू शकतो का? याबाबत अनेकांनी विचार न करता पैसे पाठवले. तर काही जणांनी या बाबत मोक्षदा पाटील यांना संपर्क केला. आणि कोणीही मदत पाठवू नये असे आवाहन करण्यात आले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले : विशेषतः समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांचे बनावट खाते तयार केले जाते. त्यांच्या मित्रांना मैत्री करण्याबाबत संदेश पाठवले जातात. काही दिवसांनी अधिक लोक जोडल्या गेल्यावर, त्या खात्याचा उपयोग करून आर्थिक अडचणीत असल्याच सांगत पैशांची मागणी केली जाते. त्यात काही नागरिक फसले जातात आणि सरळ मदतही करतात. मात्र असं पैसे पाठवताना तो नंबर कोणाचा आहे? याची खात्री केली जात नाही आणि सरळ पैसे दिले जातात अशा फसवणगिरी पासून सावध राहण्याचा आवाहन सायबर सेल कडून करण्यात आले आहे.
अशी थांबवा फसवणूक : आर्थिक फसवणूक पासून बचाव करण्यासाठी सायबर सेल तर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. एखाद्या समाज माध्यमांवर मदतीचे आवाहन आल्यावर सर्वात आधी संबंधित व्यक्तीला त्याबाबत विचारणा करणे गरजेचे आहे. इतकच नाही तर पैसे पाठवताना ते नेमके कोणाच्या खात्यात जात आहे याची शहानिशा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्याचं कळाल्यावर 24 तासाच्या आत तक्रार केल्यास बँकेचे व्यवहार थांबवणे शक्य आहे. त्याचबरोबर ज्याच्या खात्यावरून ही मदत मागितली गेली, ती संबंधित व्यक्ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व तयार केलेले खोटे खाते बंद करू शकते. याबाबत सायबर सेल कडून माहिती देखील देण्यात आली आहे.
हेही वाचा : Chandrakant Khaire : खैरेंची शिरसाटांवर खतरनाक कमेंट! म्हणाले, त्यांना गोव्याचा नाद