औरंगाबाद - दोन दिवसांपासून आजारी असलेल्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील करिना वाघिणीचा आज (बुधवार) सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसाआधी अन्नपाणी सोडल्यामुळे ती सलाईनवर होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र, तिला किडनीचा आजार असल्याचे समोर आले होते.
करिना नावाची सहा वर्षांची वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपासून तिने अन्न ग्रहण करणेही सोडले होते. त्यामुळे तिला सलाईनवरच जगवले जात होते. अखेर आज सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, करिना या पिवळ्या वाघिणीची मंगळवारी दुपारी कोरोना चाचणी करण्यात आली. तिची प्रकृती अधिकच बिघडल्याचे लक्षात आल्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास खडकेश्वर येथील पशू वैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी करिनाची प्रकृती तपासली आणि त्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. चाचणीसाठी वाघिणीच्या लाळेचे नमुने घेणे गरजेचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी पीपीई कीट परिधान करुन लाळेचे नमुने घेतले. या नमुन्याचे अहवाल अद्याप आले नाहीत.
दरम्यान, सकाळी तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी प्राणिसंग्रहालयात जाऊन वाघिणीच्या उपचारासंबंधी माहिती घेतली होती. परभणी येथील पथकाला वाघिणीवर उपचार करण्यासाठी बोलावण्यात आले होते. हे पथक दाखल होण्यापूर्वीच करिनाचा मृत्यू झाला.
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयापेक्षा जास्त म्हणजे एकूण १२ वाघ होते. वाघांची संख्या जास्त झाल्यामुळे ११ फेब्रुवारीला मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात शक्ती व करिष्मा ही वाघांची जोडी पाठवण्यात आली. त्यामुळे सध्यस्थितीत औरंगाबादच्या या प्राणीसंग्रहालयात दहा वाघ शिल्लक आहेत.