औरंगाबाद - दोन दिवसांपासून शटर समोर झोपलेला व्यक्ती कोणतीही हालचाल करत नसल्याची बाब नागरिकांच्या समोर आली. मात्र, सध्या कोरोनाच्या भीतीमुळे मृत व्यक्तीला उचलण्यासाठी तब्बल सव्वा पाच तास लागले. आझाद चौकात एक व्यक्ती रात्रीपासून बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. मंगळवारी तो व्यक्ती मृत असल्याचे समजल्यानंतर केवळ सेफ्टीकीट नसल्यामुळे त्याला उचलण्यास तब्बल सव्वापाच तास लागले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो व्यक्ती मागील दोन दिवसांपासून दुकानाच्या कोपऱ्यावरच झोपून होता. मंगळवारी मात्र तो उठलाच नाही. माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी महानगरपालीकेच्या स्थानिक अधिकारी व रुग्णालयाला कळवून रुग्णवाहिका पाठवण्याची मागणी केली. कुलकर्णी यांनी अडीच वाजेपासून वारंवार कॉल करूनही तब्बल दीड तासाने एक रुग्णवाहिका दाखल झाली. त्यातही चालकाव्यतिरीक्त कोणीही नसल्याने इतर वेळी मृतदेह उचलून नेणारे पोलीस देखील यावेळी कोरोनाच्या धास्तीने मृतदेह उचलण्यासाठी घाबरले.
त्यात दुसरी रुग्णवाहिका येऊन उभी राहिली. मात्र, तरीही मृतदेह तसाच पडून होता. मनपाचे कर्मचारी सेफ्टीकीटसाठी धावपळ करत असताना अखेर सव्वापाच वाजता रुग्णवाहिकेत सेफ्टीकीट असल्याचे चालकाला कळाले. त्यानंतर चालक व सिडको पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सेफ्टीकीट परिधान करून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकला.