औरंगाबाद - राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती रूग्ण संख्या चिंतेची बाब असल्यामुळे राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, रूग्ण संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. मात्र, सोमवारी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केल्यानंतर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. गुढीपाडवा आणि आंबडेकर जयंती एकापाठोपाठ उत्सव असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचा फज्जा उडाला.
पोलीस येताच झाली दुकाने बंद -
व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करताच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. औरंगपुरा, पैठण गेट, गुलमंडी, शहागंज, रंगार गल्ली, सिटीचौक भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. याची माहिती मिळताच ठिकठिकाणी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दुकानदारांना दुकाने बंद करा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.
गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीच्या खरेदीसाठी गर्दी -
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लागोपाठ असल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी उघडलेली दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक नागरिकांना आल्यापावली घरी परत जावे लागले.
हेही वाचा - LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..