गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील कायगाव, गंगापूर परिसरात गुरुवारी रात्री नऊ ते अकरा दरम्यान अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या गहू, ज्वारी, हरबरा व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या फटक्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्याने शेतकरी हतबल झाले आहेl. या नुकसानग्रस्त पिकांची प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कायगाव गंगापूर रोड लगत असलेल्या गंगापूर शिवारातील गणेश भानुदास पुराणिक यांच्या अडीच एकर क्षेत्रातील गहू गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी वाऱ्याने व रिमझिम पाऊसाने जमीनदोस्त झाला आहे. दानेभरणीच्या वेळी गहू आडवा पडलेल्याने गव्हाच्या ओंबीत दाणे भरण्याची शाश्वती नाही. त्यामुळे महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस, वादळामुळे नुकसानग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करत आहे.
फळझाडांचा मोहर ही गळाला-
बेमोसमी वादळी वाऱ्याने तालुक्यातील फळझाडांना फटका बसला आहे. आंब्याचे मोहर, छोट्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. वातावरणात गारवा असून ढगाळ वातावरण आहे. सध्या काढणी आलेले गहू, हरभरा, कांदा, ज्वारी आदी पिकांवर बेमोसमी पावसाचे संकट घोंगावत आहे. यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट