औरंगाबाद - कोरोना वाढता संसर्ग पाहता घराबाहेर पडताना आणि कंपनीत काम करताना भीती तर वाटते. मात्र, आता या आजारासोबत राहण्याची तयारी करत असून सुरक्षित राहून काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत औरंगाबादच्या कामगारांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे कंपनीत काम करताना भीती वाटते, मात्र त्यावर मात करून काम करतोय - कामगारांची भावना औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. बजाज सारख्या कंपनीत दीडशेहून अधिक रुग्ण निघाल्याने औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, कामाची गरज असल्याने भीतीच्या सावटाखाली काम करणाऱ्या कामगारांनी आता खबरदारी घेत कामाला सुरुवात केली आहे.कोरोनामुळे कंपनीत काम करताना भीती वाटते, मात्र त्यावर मात करून काम करतोय - कामगारांची भावना औरंगाबाद राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहे. शहराची औद्योगिक नगरी अशी ओळख आहे. याच उद्योगांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने कामगार वर्गांमध्ये भीती पसरली होती. अनलॉक वनमध्ये कंपनी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कामगारांना घेऊन कारखाने सुरू झाले. सुरुवातीला सुरक्षित वाटणाऱ्या कारखान्यांमध्ये हळूहळू कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली. मात्र पोटाचा प्रश्न असल्याने कामगार कामावर जात होते.घरी येताना आपण बाधित तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडायला लागले. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औद्योगिक वसाहतीत बंद पाळण्याची मागणी करण्यात आली. मात्र आधीच दोन महिन्यांच्या बंदमुळे उद्योगांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे 'उद्योगांचा बंद करू नका' यासाठी उद्योजक आक्रमक होते. अशा परिस्थितीत कामगारांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. कंपनीत काम करताना कामगार स्वतःहून काळजी घेऊ लागले आहेत. जेवण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. एका टेबलवर जेवण करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कामावर येत असताना कंपनीच्या प्रवेशद्वाराला प्रत्येक कामगार स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत आहे. इतकेच नाही तर, एकमेकांची भीती दूर करून मनावर असलेला ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार करत आहेत. औरंगाबादच्या कामगारांसोबत विशेष बातचित केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.