औरंगाबाद - शहरातील घाटी रुग्णालयात 34 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने गोंधळ घालत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत सलाईनचे स्टँड फेकून मारले. या घटनेमुळे घाटीतील सुपर स्पेशालिटी वॉर्डात गोंधळ उडाला. या प्रकरणी घाटी चौकीत नोंद करण्यात आली आहे.
आयसीयूतील उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णाला साधारण वार्डात हलविण्यात आले. कोरोना बरा झालेला असला तरी रुग्णाला कावीळ झालेला आहे. त्यावरही उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असताना रविवारी रुग्णाची अचानक मानसिक स्थिती ढासळली. त्याने स्टूलने दरवाजाच्या काचेची तोडफोड केली. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.
रुग्ण अल्कोहोलिक असल्याने अटॅक आल्याची शक्यता -
घाटी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण अल्कोहॉलिक आहे. क्रॉनिक अल्कोहोलिक रुग्णांना एक दिवसही दारू न मिळाल्यास त्यांच्यात सिम्प्टम्स येतात. त्याचा अटॅक आल्याने हा सर्व प्रकार घडला असावा. त्याचे यकृतही खराब झालेले आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.