औरंगाबाद - काँग्रेस पक्षाने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना 'बी' फॉर्म दिला आहे. 'बी' फॉर्म नसतानाही झांबड यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने ऐन वेळी उमेदवारी बदलल्याची अफवा पसरली होती. मात्र, सकाळी काँग्रेस पक्षाने 'बी' फॉर्म दिल्याने सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. सुभाष झांबड यांची उमेदवारी अधिकृत होताच, काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनीही लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात कँग्रेस अंतर्गत वादामुळे राज्याचे लक्ष लागले होते. काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला रोष व्यक्त केला. पक्षाशी बंडखोरी करत अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर जाहीर सभा घेत, मोठे शक्तिप्रदर्शन करून त्यांनी कंग्रेसवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी घेतली होती. सत्तार यांना पक्षश्रेष्ठी झांबड यांची उमेदवारी रद्द करून आपल्याला उमेदवारी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सकाळी सत्तार यांच्या उमेदीवर पाणी फिरले. काँग्रेस पक्षाने 'बी' फॉर्म सुभाष झांबड यांच्या नावाने दिला. त्यामुळे सत्तार यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. अब्दुल सत्तार यांनी अपल्या समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने घात केल्याने काँग्रेसच्या विरोधात प्रचार करून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केला.