औरंगाबाद - शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबरोबरच त्यांना चिंतामुक्त करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जो लढतो, तो जिंकतो त्यामुळे लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. शहरात महाएक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
येणाऱ्या काळात कृषी आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयोग करावा लागेल असेही ठाकरे म्हणाले. तुम्हाला तुमच्या पायावर उभे करणारं हे सरकार आहे. अडचणींवर मात करायला हवी. सरकार स्थापन करायला आम्हाला अनंत अडचणी आल्या, मात्र आम्ही मात केल्याचे ठाकरे म्हणाले. जगात मंदी आहे, त्याचबरोबर देशातही मंदी आहे. मात्र, त्यावर मात करावी लागेल. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच आहे. मात्र, त्याला चिंतामुक्त देखील करणार आहे. दोन घास पिकवण्याचे काम शेतकरी करतो, म्हणून त्यांना मदत केली पाहिजे. त्यामुळेच कृषी आणि उद्योग या दोन खात्यांचे सांगड घातली तर फायदा होईल. तसा प्रयोग करणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
मेड इन इंडियाची छाप जगावर पाडू शकतील इतकी ताकद आपल्या उद्योजकांमध्ये असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. औरंगाबाद बिडकीन येथे 500 एकर जागेवर अन्न प्रकिया उद्योग उभारणार आहे. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये रोजगार निर्मिती केंद्र उभारणार असून, त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.