औरंगाबाद - नारेगावचे नगरसेवक गोकुळ मलके यांना पोलीस अधिकाऱ्याने कथितरित्या शिवीगाळ केल्यामुळे येथील नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी मतदान प्रक्रियेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अकमल यांनी मलेक यांना शिवीगाळ केली, असा आरोप आंदोलकांनी केला.
नारेगाव परिसरात लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अकमल हे त्या भागात कर्तव्यासाठी तैनात होते. दुपारी चारच्या सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर असेलेले नारेगाव वार्डाचे नगरसेवक गोकुळ मलके यांना खालच्या पातळीवर शिवीगाळ केल्याचा आरोप मलके यांनी केला. या घटनेनंतर नारेगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता.
निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने स्थानिक नेत्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र २४ एप्रिल रोजी सकाळी नारेगावच्या नागरिकांनी पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करत पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलीस उपनिरीक्षक अकमल यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
आमदार अतुल सावे आणि पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक अकमल यांच्यावर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर नागरिकांनी आपला ठिय्या मागे घेतला. मात्र, कारवाई झाली नाही तर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.