औरंगाबाद - दिवाळीच्या निमित्ताने बाजार सजले आहेत. रौशनाई करण्यासाठी ग्राहक लायटिंग खरेदी करत आहेत. यावर्षी देखील चीनी लायटिंगचाच दबदबा पाहायला मिळत आहे. देशी लायटिंगच्या विक्रीपेक्षा चीनी लायटींगची विक्री तीनपट अधिक होत आहे.
कोरोनाला चीन जबाबदार असल्याने यंदा चीनी वस्तूंच्या विक्रीत घट होईल, असा अंदाज होता. मात्र, भारतीय बनावटीची लायटिंग चीनी लायटिंगच्या तुलनेत महाग असल्याने दिवाळीत चीनी लायटिंगचा बोलबाला पाहायला मिळत असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
प्रकार जास्त, किंमत कमी, त्यामुळे चायनीज लायटिंगला मागणी
गेल्या काही वर्षांमध्ये चीनी लायटिंगणे भारतीय बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले आहे. स्वस्त, आकर्षक आणि विविध प्रकारात उपलब्ध असल्याने चीनी लायटिंगची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ३० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आकर्षक अशी जास्त लांबीची लायटिंग उपलब्ध असते. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी लायटिंग मिळत असल्याने चीनी लायटिंगला मोठी मागणी असते, आणि ती यावर्षी देखील कायम आहे.
भारतीय बनावटीच्या लायटिंगमध्ये अनेक मर्यादा
चीनी लायटिंगचा दबदबा मोडीत काढण्यात भारतीय बनावटीच्या लायटिंग कमी पडत आहेत. त्या गुणवत्तेत चीनी लायटिंगपेक्षा अधिक चांगल्या असल्या तरी मर्यादित प्रकारच्या असून महागही आहे. त्यामुळे, भरतीय बनावटीच्या लायटिंगला ग्राहक कमी पसंती देतात. असा अनुभव व्यावसायिकांनी व्यक्त केला.
कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने लायटिंगच्या आयातीवर परिणाम
कोरोनामुळे चीन येथून वस्तूंच्या आयातीवर काही निर्बंध असल्याने दरवर्षीपेक्षा लायटिंगची आयात कमी झाली आहे. जवळपास ४० टक्क्यांचा परिणाम झाल्याने यंदा बाजारात चीनी लायटिंग कमी प्रमाणात उपलब्ध आहे. असे असले तरी मागणी वाढत आहे. त्यामुळे, यावर्षी देखील चीनी लायटिंगची विक्री दरवर्षी प्रमाणेच असल्याची माहिती औरंगाबादच्या लायटिंग व्यावसायिकांनी दिली.
हेही वाचा- बिहार निवडणूक : सर्वात चांगला स्ट्राईक रेट एआयएमआयएमचा - खासदार इम्तियाज जलील