छत्रपती संभाजीनगर : शहरात भर दिवसा लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी खंडणी मागण्याचे तर कधी चोरीचे प्रकार सर्रास होत आहेत. अशीच आणखी एक घटना क्रांतीचौक भागात सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बँकेतून पैसे काढून जात असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, संधी मिळताच तीन लाखांची बॅग पळवतानाची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.
व्यापाऱ्याची भर दिवसा लूट : गाजिया विहार येथील रहिवासी असलेले व्यापारी नवाब जमीर खान पठाण यांनी जिल्हा न्यायालयासमोरील आयसीआयसीआय बँकेतून तीन लाखांची रक्कम काढली. तिथून निघाल्यावर त्यांना अचानक दोनजण पार्किंग भागात त्यांना भेटले. तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणत पठाण यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र हे पैसे माझे नसल्याचे उत्तर नवाब जमीर खान पठाण यांनी देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नंतर त्या दोघांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर पठाण यांना आपली दुचाकी पंक्चर असल्याचे लक्षात आले. तिथून त्यांनी गाडी ढकलून क्रांती चौक पेट्रोल पंपावर नेली आणि तिथेच या चोरांनी डाव साधत तीन लाखांची बॅग पळवली.
पैसे देताना पळवली बॅग : बँकेतून निघाल्यावर पठाण यांना आपली दुचाकी पंक्चर असल्याचे कळले. मात्र आसपास दुकान नसल्याने त्यांनी जवळपास एक किलोमीटर असलेल्या क्रांतीचौक भागातील दुकानापर्यंत दुचाकी ढकलत नेली. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्या मागावर होते. गाडीचे पंक्चर काढताना पैसे देतेवेळी पठाण यांनी बॅग दुचाकीवर ठेवली. त्याचवेळी संधी साधून पाठलाग करणाऱ्यांपैकी एकाने बॅग उचलून पळ काढला. त्यावेळी सोबत असलेला दुसरा आरोपी गाडी सुरू ठेवून पळण्याच्या तयारीत होता. बॅग घेऊन तो उडी मारून गाडीवर बसला. दोघेही वेगाने पळून गेले. पंक्चर दुकानदार त्यांच्यामागे पळाला, त्याने आपली हातोडी पण आरोपीच्या दिशेने भिरकावली होती. मात्र तोपर्यंत दोंघेही पळून गेले. ही घटना पेट्रोल पंपवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :