छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - आईनं जाळण्याचा प्रयत्न करूनही भीतीनं तरुणी पाच दिवस घरातच राहिली. मात्र, संधी साधून तिनं पळ काढला. तिनं पोलिसात ही सत्य घटना सांगितली. याप्रकरणी आई पार्वती हलमुख आणि तांत्रिक महिला शकुंतला अहिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप त्यांना अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीयं.
मुलीला जाळले- तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. मिसारवाडी भागात पीडिता ही आई आणि भावासह वास्तव्यास आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबात तिघेच असल्यानं पीडिता नोकरी करते. 17 ऑगस्टला गुरुवारच्या पहाटे सकाळी चारच्या सुमारास तिच्या अंगाला अचानक चटके बसू लागले. झोपेतून उठून पाहिल्यावर अंगावर घेतलेल्या चादरीला आग लागलेली होती. अंगावर पेट्रोल शिंपडलेले होते. त्यावेळी पीडितेची आई बाजूला उभी होती. यावेळी आई मुलीला वाचवण्याऐवजी घटना पाहत होती.
पीडितेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू- आईनंच जाळण्याचा प्रयत्न केल्याचं समजताच मुलीला धक्का बसला. भावाच्या मदतीनं कशीबशी त्या आगीतून पडली. आईनं पोलिसातदेखील जाऊ दिले नाही. तिच्यावर घरातच जखमांवर उपचार केलं. काही कामानिमित्त ती घराबाहेर गेल्यावर वेळ पाहून पळ काढत पोलीस ठाणे गाठल्याचे पीडित मुलीनं तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं.
तांत्रिक महिलेने सांगितल्याने जाळले- पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पाठीवर, मानेवर व केसांच्या ठिकाणी चटके बसले आहेत. पीडित मुलीने आपली आईला जाब विचारला. त्यावेळी, तिच्या आईनं सांगितले, मिसारवाडी येथे राहणाऱ्या शकुंतला अहिरे हिच्या सांगण्यावरून जाळण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकल्यास तुला धनलाभ होईल, असे तांत्रिक महिलेनं पीडितेच्या आईला सांगितले. मुलाचे देखील चांगले होईल, असेही तांत्रिक महिलेने सांगितले. त्यामुळे मी हे पाऊल उचलले, असे निर्दयी आईने मुलीला सांगितले.
दोघींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल-शकुंतला ही जादूटोणा मांत्रिकाचे काम करते, असा आरोप होत आहे. ती अनेकांना अशाच पद्धतीने सल्ले देते, अशी धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी आई पार्वती हुलमुख आणि तांत्रिक शकुंतला अहिरे या दोघींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना अटक केल्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सिडको पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा-