औरंगाबाद - उस्मानपुरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत एका व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जमावाने कारवाई करण्याचा मगणीसाठी ठिय्या मांडला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी मारहाण केलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या व्यावसायिकाचा मृत्यू कसा झाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जमावाच्या दाबावानंतर पाच जणांवर कारवाई -
उस्मानपुरा येथील एक केशकर्तनालय सुरू असल्याने सलून चालकावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले होते. दरम्यान, फेरोज खान कदीर खान याला पोलीस ठाण्यात नेत असताना तो खाली पडून जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे फिरोज खान कदीर खान (वय 50 वर्षे) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांविरोधात जमावाने ठिय्या आंदोलन केले होते. जमावाच्या दबावामुळे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी पोलीस निरीक्षकासह पाच जणांची मुख्यालयात बदली केली.
रात्री उशिरा सीसीटीव्ही आले समोर -
व्यावसायिकाच्या मृत्यूनंतर उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर दोन ते तीन तास जमावाने गर्दी करून पोलिसांवर कारवाई करावी व्हावी यासाठी आंदोलन केले. पोलीस आयुक्तांनी जमावाची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले. मात्र, रात्री उशिरा सलून जवळील सीसीटीव्ही समोर आले. ज्यामध्ये मृत फेरोज खान कदीर खान यांच्या बाजूला एक व्यक्ती होता. त्याच्या बाजूला एक पोलीस कर्मचारी उभे राहून काही चर्चा करत होते. त्यावेळी फिरोज खान अचानक खाली कोसळले. त्यांना पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने रूग्णालयात हलवले, असे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याने फिरोज खान यांच्या मृत्यूबाबत संभ्रम निर्माण झाली आहे.