औरंगाबाद: औरंगाबादमध्ये बालविवाह झाल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी तीन वर्षांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिला आजीकडे ठेवण्यात आले. वडिलांनी दुसरा विवाह करत नवीन संसार थाटला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यात आई आणि आजीने साथ दिली. तिला शिकायचे होते, मात्र तिचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेता हैदराबाद येथील 25 वर्षीय इसमाशी तिचा 8 जानेवारी रोजी विवाह करून दिला. मात्र मुलीला हा विवाह मान्य नव्हता, तिला शिक्षणाची आवड असल्याने तिला खूप शिकायचे होते. त्यामुळे तिने नवऱ्याच्या तावडीतून सुटण्याचा निर्धार केला आणि ती बाहेर पडली.
रेल्वे स्टेशनवर फिरताना आढळली: लग्नानंतर काही दिवसांनी पीडित मुलीने नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेत मामाच्या घरी गेली. मात्र कुटुंबीयांना माहिती मिळाल्याने त्यांनी हैदराबाद येथे नेऊन सोडण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने थेट रेल्वेस्टेशन गाठले. मात्र कुठे जायचे तिला कळत नव्हते. ती औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर संशयितरित्या फिरताना आढळून आली. तिथे असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी करत तिला, दामिनी पथकाच्या स्वाधीन केले. भरोसा सेल येथे आल्यावर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. त्यावरून जीन्सी पोलीसात आई, वडील, नवरा, आजी यांच्यासह इतर चार जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बालक न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. न्याय मंडळाच्या आदेशाने तिच्या शिक्षणाची सोय केली जाईल, असे पोलीसांकडून सांगण्यात आले.
तिच्या धाडसाचे कौतुक: पीडित मुलीने उचललेले पाऊल सर्वत्र कौतुकाचा विषय होत आहे. शिक्षण घेण्याची तिची जिद्द इतकी मोठी आहे की, त्यात तिने टोकाचे पाऊल उचलले. शिक्षणामुळे ज्ञान मिळते, प्रगती होते असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय या घटनेतून समोर आला. लग्नाचे आपले वय नसताना आई-वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले. याची जाण तिला होती. म्हणूनच तिने आवाज उठवत स्वतःची सुटका करून घेतली. आई वडील आणि समाजाचा विचार न करता तिने टोकाचे उचलत आपली सुटका करून घेतली. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे धाडस इतर मुलींनी दाखवल्यास त्यांची देखील निश्चित सुटका होऊन भविष्य चांगले होईल हे नक्की.