छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : किराडपुऱ्यातील राड्यात एका 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रामनवमीच्या रात्री किराड पुरा मंदिर परिसरात दोन गटाकडून झालेल्या दगडफेकीत ही व्यक्ती जखमी झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. तर आणखी एक व्यक्ती गंभीर आहे.
हिंदू धर्मीय बांधवांच्या साठी महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी आहे. हा दिवस राज्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांनी साजरा झाला. तर छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा येथील राममंदिर बाहेर मध्यरात्री गोंधळ होता. याप्रकरणी किराडपुरा जाळपोळ प्रकरणी पोलीसांनी सात संशयितांना त्यांना ताब्यात घेतले आहे. चारशे अज्ञात लोकांविरोधात जीन्सी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पोलिसांची वाहन पेटवत दगडफेक केली होती. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळे पोलिसांचे पथक तयार केले आहेत. लवकरच आरोपी अटकेत असतील अशी माहिती पोलिसांनी दिली.
राम मंदिर परिसरात झाली होती जाळपोळ: गुरुवारी मध्यरात्री रामनवमीची तयारी सुरू असताना किराडपुरा येथील राममंदिर परिसरात दोन गटात झालेल्या वादातून प्रचंड प्रमाणात दगडफेक सुरू झाली. त्यातच तिथे असलेली वाहन जमावाने पेटवून दिली. त्यात पोलिसांच्या वाहनांचादेखील समावेश आहे. दगडफेकीमध्ये 17 पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार देखील केला. यात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. तर अन्य काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेत अंदाजे तीन कोटी रुपयांचा नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलीसांनी तपास केला सुरू: किराडपुरा भागात झालेल्या घटनेनंतर पोलीसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली आहे. 400 जणांविरोधात जिंसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथक तयार करण्यात आली आहेत. परिसर आणि शहरात वेगवेगळ्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू करण्यात आला आहे. विशेषतः राम मंदिर परिसर आणि आसपासचे सीसीटीव्ही तपासण्याच काम पोलीस करत आहेत. कुठलीही अप्रिय घटना होऊ नये , यासाठी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पोलीस उशिरा आल्याचा आरोप: गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीनंतर, त्या घटनेला दंगलीचा स्वरूप प्राप्त झाले. मात्र त्यावेळी पोलीस उशिरा दाखल झाले असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. त्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अचानक झालेल्या घटनेनंतर त्यांना नियंत्रण करण्यासाठी योग्य पद्धतीने पावले उचलणे गरजेचे होते. त्यामुळे पूर्वतयारी करून पूर्ण क्षमतेने दंगलग्रस्तांना अडवले. घाई गडबड केली असती तर अजून नुकसान झाले असते. त्यामुळे काही पावले योग्यरीत्या उचलावी लागली, असे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा: Kiradpura riots राजकारण नको म्हणत त्या घटनेवरुन विरोधकांचे आरोप प्रत्यारोप