औरंगाबाद - आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्र तयार करून चोरलेले ट्रक हस्तांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी आधीच नकाते फरार झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. परराज्यातून चोरून आणलेल्या ट्रकचे बनावट कागदपत्र तयार करून महाराष्ट्र परिवहन विभागात त्याचे हस्तांतर होत असल्याची बाब समोर आली आहे. तपासात असे ६ ट्रक प्रथमदर्शनी आढळून आले असून त्यातील दोन ट्रक औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत.
हेही वाचा - जिल्हा क्रीडा संकुलाचा श्रेयवाद; वडेट्टीवार-मुनगंटीवारांच्या राजकीय वादात क्रीडा अधिकारी धारेवर
मणिपूरमधून चोरीला गेलेली वाहने औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्र तयार करून हस्तांतरित करण्यात आली होती. या वाहनांची पुर्ननोंदणीही करण्यात आली होती. ही नोंदणी सहायक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी आरटीओ प्रशासनाला पाठविला होता. या अहवालाच्या आधारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी गुरुवारी वेदांतनगर पोलीस ठाण्यात नकातेंसह अन्य आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत.
हेही वाचा - घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्राची मूल्ये आठवताना...
नकाते यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी कार्यालयात गेले असता ते कार्यालयात आले नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्यांनी अधिकृत रजेसाठी अर्जही सादर केला नव्हता. परवानगी न घेता नकाते गैरहजर असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले.