औरंगाबाद - अमेरिकेतून आलेले दोन कोरोना संशयित शुक्रवारी (ता.20) कन्नड शहरातून गायब झाल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शरद पवार कॉलनी येथील हिराबाई दिलीप वायकोस यांच्या घरात अमोल वायकोस व सिद्धी शेट्ये हे दोघे अमेरिकेहून आलेले असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला बुधवारी (ता.18) कळली. त्यानुसार नगर पालिकेचे कर्मचारी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता या दोघांनी व त्यांच्या कुटुंबातील इतरांनी आमची मुंबईला क्रिनिंग झालेली आहे, आम्हाला काही झालेले नाही, आम्ही दवाखान्यात येणार नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन नगर पालिकेच्या पथकाला परत पाठवले.
सदर प्रकरणाची लेखी माहिती या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिली. तसेच गुरुवारी (ता.19) कन्नड ग्रामीण रुग्णालयानेही कन्नड शहर पोलिसांना पत्र लिहून सदर दोन्ही संशयितांना पुढील उपचार अथवा निदानासाठी जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आले असून सदर रुग्ण जाण्यास टाळाटाळ करत असल्याने, पोलिसांनी त्यांना औरंगाबाद येथे घेऊन जाण्यास योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली.
दुसरीकडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दोघांची विमानतळावर स्क्रिनिंग झाली असून दोघांची तब्बेत ठणठणीत आहे. ताप,सर्दी किंवा कोरोनाच्या कोणतेही लक्षण त्यांच्यात नाही.
असे असले तरी दोघांनी नगर पालिका व वैद्यकीय प्रशासनाला सहकार्य करत औरंगाबाद येथून निदान करायला हरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या संशयितांना जर खरोखर कोरोनाची लागण झालेली असेल तर मोठा अनर्थ होऊ शकतो. कारण हे दोघे गुरुवारपर्यंत शहरात राजरोस पणे फिरत असल्याची माहिती मिळते आहे.
हेही वाचा - 'त्या' महिला डॉक्टर विरोधात साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
सदर संशयित 7 मार्चला अमेरिकेतून मुंबईला आले. त्यानंतर ते 17 मार्चला कन्नडला आले. 19 मार्चला त्याबाबत आम्हाला कळल्यानंतर त्यांना आम्ही पुढील निदान किंवा उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली, जाण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही सदर बाब पोलिसांना कळवली आहे, असे डॉ.दत्ता देगावकर (वैधकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कन्नड) म्हणाले.
कोरोनाची दोन संशयित शहरात असून ते ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तपासणीसाठी सहकार्य करत नाहीत. त्यांना औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र ग्रामीण रुग्णालयाने आम्हाला दिले आहे. मात्र, पोलीस थेट रुग्णाला स्वतः कोठेही नेऊ शकत नाहीत, पोलिसांना मास्क नाहीत, प्रशिक्षण नाही. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकासोबत पोलीस जाऊ शकतात. मात्र, पोलीस रुग्ण कसे नेणार, पोलिसांकडे तशी यंत्रणा नाही, असे कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे म्हणाले.
हेही वाचा - कोरोनाचे थैमान : कस्तुरबा रुग्णालय 'हाऊसफुल', पालिकेच्या इतर रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड, ओपीडी सुरू