छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : शेतकऱ्यांच्या मागे लागलेले संकट कमी होत नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याने बळीराजाला अक्षरशः रडवले आहे. अनेकवेळा मागण्या मांडल्या, आंदोलने झाली मात्र सरकार दरबारी दखल घेतली गेली नाही. त्यातच आता राज्यात शेती मालाला भाव मिळत नसेल तर, तेलंगणात या, असे आवाहन हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, एम रविकांत यांनी केले. सोमवारी कन्नड येथे कांद्याला भाव द्या या मागणीसाठी बीआरएस पक्षात दाखल झालेले, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती दिली.
कांद्यासाठी झाले आंदोलन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांनी, सोमवारी कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शासकीय खरेदी केंद्र उघडून शेतकऱ्यांचा कांदा आणि कापूस खरेदी करून, दरवर्षी दहा हजार रुपये प्रति एकरी अनुदान देण्याची मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.
तेलंगणात कांदा पाठवा : आंदोलन झाल्यानंतर हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एम रविकांत यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. तुमचा सर्व कांदा तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही योग्य दारात खरेदी करू असे आश्वासन त्यांनी दिले. व्यापारी 3 ते 4 रुपये किलो अशा कवडीमोल भावाने कांदा विकत घेतात. तसेच तो तेलंगणात 17 ते 18 रुपये दराने विक्री करतात. त्यामुळे थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले होते. त्यानुसार एम. रविकांत कन्नड तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तुम्हाला शेतीमालाला भाव मिळत नसेल तर आमच्याकडे पाठवा, आम्ही योग्य भाव देऊ असे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी लागणारे बारदान, मजूर, ट्रक पाठवू देऊ, तसेच योग्य दर तुम्हाला मिळून देऊ असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांनी सोमवारी कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एम रविकांत यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तुम्हाला शेतीमालाला भाव मिळत नसेल तर आमच्याकडे पाठवा, कांद्याला योग्य भाव देऊ तसेच बारदान, मजूर, ट्रकही पाठवू योग्य दर तुम्हाला मिळून देऊ. - एम. रविकांत
राज्यातील शेतकऱ्यांना भाव देऊ : भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारला याबाबत निवेदन दिले. कांदा आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करा. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सकारात्मक घेत नाही, त्यामुळे तेलंगणा राज्यातील बाजार समितीकडे आम्ही न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सर्व कांदा योग्य दराने विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कन्नड तालुका नाही तर, राज्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आम्ही आमचा कांदा तेलंगणाला पाठवू आणि पिकाला चांगले दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू असे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -