कन्नड (औरंगाबाद) - ग्रामीण, दुर्गम व अति दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा व अडचणी आहेत. मात्र, या अडचणींवर मात करून मुलांना शिक्षण देण्याचा शासन व शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचे मत कन्नड येथील गटशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी व्यक्त केले.
दरवर्षी 15 जून दरम्यान राज्यातील शाळा नियमित शिक्षण सुरू होते. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी उघडणार ?, मुलांच्या शिक्षणाचे काय होणार? याबाबत पालक, शिक्षक, शिक्षण विभाग व शासन स्तरावर संभ्रमावस्था व चिंता दिसून येत आहे. मुले शाळेत न येता घरीच ऑनलाइन शिक्षण घेतील असा एक मार्ग शासनाच्या वतीने काढण्याची चाचपणी सुरू आहे. त्यावर पालकांत मोठी चर्चा सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी असल्याने उशिरा का होईना शाळा सुरू करुन प्रचलित पद्धतीने शिक्षण देण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे.
यावर आज अश्विनी लाटकर यांनी शासनाची व शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ऑनलाइन शिक्षण हे सध्याच्या परिस्थितीवर काढण्यात आलेला एक तोडगा आहे. याचा अर्थ कोरोनाच्या परिस्थिती भविष्यात अशीच राहील व ऑनलाइन शिक्षणच विद्यार्थ्यांना घ्यावे लागेल असे नाही. नियंत्रित पद्धतीने शाळा सुरु करण्याचाही शासनाचा विचार आहे. पालकांनी हा मुद्दा सकारात्मतेने घ्यावा. शासन कोणत्याही परिस्थितीत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे. कन्नड तालुक्यासाठी शिक्षण विभागाकडून या शैक्षणिक वर्षासाठीचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे सांगत शासनाच्या प्रयत्नांना पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी लाटकर यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना पतकोंडे यांनी सांगितले की ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना या विषय सविस्तर माहिती देऊन त्यांना यामधे विश्वासात घेतले जाईल. सोशल डिस्टनसिंगचे पालन करत जिथे ग्रीन झोन आहे, तिथे शाळा भरविल्या जातील आणि शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन यावेळी केले जाईल.
हेही वाचा - कन्नड़ तालुक्यात गावरान आंब्याची 50 टक्क्यांनी घट, लोणच्यासाठी कैऱ्या घेण्यास नागरिकांची गर्दी