औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कामाला सुरुवात केली. आघाडीत बिघाडी असल्याने विजय भाजपचा होणार, असा विश्वास शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
मागील बारा वर्षात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र या काळात त्यांनी आपल्या मतदारांचे प्रश्न सोडवले नाहीत. एका शिक्षण मंडळाच्या भरवश्यावर त्यांनी कामे केली. शिक्षकांना शिक्षकी कामाशिवाय इतर काम करायला भाग पाडले, त्यामुळे यावेळी भाजपच विजयी होईल, असा विश्वास भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
पदवीधर मतदारसंघात दोनवेळा विजय मिळवूनही त्यांनी चव्हाणांनी कामे केली नाहीत. आज ज्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या भरवश्यावर त्यांनी निवडणूक लढवली, त्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्याऐवजी कामाला लावले जात आहे. पक्षातील कार्यकर्त्यांऐवजी शिक्षकांना धमकी देऊन कामाला लावले जाते. त्यामुळे मतदारांमध्ये निराशा आहेच, असा आरोप भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केला.
2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे झाला पराभव-
याआधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मागील दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला. 2014 मध्ये ऐन निवडणूक काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याने भाजपात निराशा पसरली होती. त्यामुळे या निवडणुकीत आमचा प्रभाव होणार अस समज करूनच काम झाले. तरी चांगली मत मिळवता आली होती. मात्र यावेळी आमची तयारी जोरदार असल्याने आमचा विजय पक्का असल्याचं मत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केलं.
पक्षात अनेक संस्था चालकांनी प्रवेश केल्याने निवडणूक सोपी-
2014 नंतर भाजप अजून मजबूत झाली आहे. 2020 ची भाजप आता वेगळी आहे. मागील काही वर्षांमध्ये भाजपमध्ये शिक्षितवर्ग मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. त्यामध्ये अनेक शिक्षक संघटना आणि संस्था चालक यांचा समावेश आहे. त्यामुळे आमचा विषय होणार असल्याचा विश्वास शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
आघाडी असली तरी त्यात बिघाडी असल्याने विजय मिळणार-
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी ते एकत्रित निवडणूक वाढवतील का? याबाबत शंका आहे. त्यांच्यात बिघाडी असल्याने त्याचा फायदा होणार आहे. भाजपला विजय मिळेल असा विश्वास भाजप आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केला. भाजप उमेदवार शिरीष बोराळकर आणि आमदार अतुल सावे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.