औरंगाबाद - भाजप खासदार पुत्राने कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला केल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली. या घटनेत कार्यकर्त्यासह त्याचे आई-वडील जखमी झाले आहेत. भाजप कार्यकर्ता कुणाल मराठे यांनी याबाबत क्रांतिचौक पोलिसांत तक्रार दिली आहे.
भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्या मुलाने शनिवारी रात्री भाजप युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य कुणाल मराठेला त्याच्या घरी जाऊन मारहाण केली. याबाबतचा एक व्हिडिओ कुणाल मराठे याच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. वॉर्डातील राजकारणावरून हा प्रकार झाल्याचा आरोप कुणाल मराठे यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुणाल मराठे यांनी आपल्या वॉर्डात निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. कुणाल मराठे आणि खासदार कराड यांचे पुत्र हर्षवर्धन हे कोटला कॉलनी या वार्डातून महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे दोघांमध्ये अंतर्गत राजकीय वाद आहेत. त्यातच या वार्डात राजकारण करू नको, असे म्हणत हर्षवर्धन कराड हा आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री घरी आला. त्याने काहीही विचारण्याच्या आतच मारहाणीचा सुरुवात केली. मारहाणीत माझ्या मानेला जखम झाली असून माझ्या आईवडिलांना देखील धक्काबुक्की केली असल्याचे मराठे म्हणाले. तसेच, या प्रकरणी क्रांतिचौक पोलिसात तक्रार दिल्याचेही यांनी सांगितले.