औरंगाबाद - राज्यात शिवशाहीचे सरकार आहे की निजामाचे? असा प्रश्न भाजपा आमदार अतुल सावे यांनी उपस्थित केला. निजामाच्या काळात रामाची पूजा करण्यास बंदी होती तशीच बंदी राज्यात असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे सरकारच्या काळात रामाची पूजा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे, हे दुर्दैवी असल्याचे अतुल सावे यांनी म्हटले आहे.
5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात भाजपा आणि मनसेने रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा केला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी कलम 144 चे उल्लंघन केले म्हणून भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. रामाचे नाव घेतल्यावर गुन्हे दाखल करणारे सरकार हे शिवशाही असूच शकत नाही, असा आरोप आमदार सावे यांनी केला.
राम मंदिराचा पायाभरणी सोहळा हा देशातील असंख्य हिंदूंसाठी सण होता. दिवाळीसारखा सण साजरा करावा, अशी प्रत्येकाची भावना होती. मात्र, राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत रामाची पूजा करण्यास बंदी घातली. औरंगाबादच्या भाजपा पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे. अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा आमदार अतुल सावे यांनी सरकारला दिला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये यांनी सरकारचा निषेध केला.