औरंगाबाद - जैव विविधता, रान वेली, पशु-पक्षी, उंच सखल दऱ्या अन् फेसळणारे धबधबे गौताळा अभयारण्यातील या अनेकविध सौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडते. नितांत सुंदर गौताळा अभयारण्याची सफर म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणारा एक अविस्मरणीय सोहळाच असतो. सहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून जगभर साजरा करण्यात येतो.
हेही वाचा- कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
कन्नड गौताळा अभयारण्यात सांगली येथील पक्षी मित्र शरद आपटे, त्यांच्या पत्नी वर्षा आपटे, तर जळगाव येथील राजेंद्र गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी शिल्पा गाडगीळ यांनी पक्षी सप्ताह निमित्त गौताळा अभयारण्यातील पक्षांचे निरीक्षण केले. आपटे हे पक्षांच्या आवाजाचे अभ्यासक आहेत. गेल्या 21 वर्षापासून ते पक्षांच्या आवाजावर अभ्यास करत आहे. पक्षांच्या आवाजाचे ध्वणीमुद्रन करून त्यासंदर्भातील माहिती ते त्यांच्या बर्ड या संकेतस्थळावर देतात. त्यामुळे जगभरातील पक्षी अभ्यासकांना माहिती मिळते.
गौताळा अभयरण्यासंदर्भात ते म्हणतात की, गौताळा अभयारण्य नितांत सुंदर आहे. मोठा अधिवास येथे बघायला मिळतो. जीवसृष्टी,अधिवासास मानवजातच अपाय करत आहे. ही जीवसृष्टी,अधिवास जैविक साखळी या एकमेकांना सहाय्यभूत आहे. ते टिकविण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर,व्यावसायिक,नोकरदार सर्वांनीच यासाठी सजग राहून सकारात्मक सृष्टीने वेळीच पाऊले उचलणे गरजेचे आहे.
तर गाडगीळ म्हणाले की, पक्षांच्या विविध प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षांच्या बाबतीत जनमानस म्हणावा तसा जागरूक नाही. माणसा-माणसात जागरूकता वाढीस लागून परिसरातील नागरिकांनी पक्षी मित्र मंडळात सहभागी होऊन रुची वाढवावी. जगातील पक्षी मित्र संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. जगातील आणि आपल्या माहितीचे आदान प्रदान होऊन जागतिक स्तरावरील संशोधनासाठी त्यांचा नक्कीच फायदा होईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांचा सहभाग या विषयाकडे वाढविला पाहिजे.
जळगाव येथील राजेंद्र गाडगीळ हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शिल्पा गाडगीळ या सेवानिवृत्त ग्रंथपाल आहेत. त्याचप्रमाणे शरद आपटे सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत. तर त्यांच्या पत्नी वर्षा आपटे मतिमंद मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करतात. शरद आपटे पक्षांच्या आवाजाचे सूक्ष्म अभ्यासक आहेत. पॅराबोलीक मायक्रोफोनच्या साहाय्याने ते पक्षांचे आवाज जतन करतात. प्रांतानुसार मानवांच्या ज्या प्रमाणे बोली भाषा बदलतात त्याच प्रमाणे पक्षांच्या देखील भाषा बदलतात. तसेच एका जातीचे पक्षी यांची भाषा आणि इतर जातींचे पक्षी यांच्यातील बोलीभाषा वेगळी असते.