औरंगाबाद - राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. कुंबेफळ येथे भास्कर जाधव यांनी हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा स्वीकारला असून भास्कर जाधव दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सकाळी नऊच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले. माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ. अंबादास दानवे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला.
राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची गळती थांबत नसल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील सेनेत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज त्याला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे.
आमदार भास्कर जाधव आज सकाळी विशेष विमानाने औरंगाबादेत दाखल झाले होते. विमानतळावर सेनेच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कुंबेफळ येथे एका खासगी कार्यालयात भास्कर जाधव यांनी हरिभाऊ बागडे यांची भेट घेत आमदारकीचा राजीनामा दिला. हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारून तत्काळ मंजूरही करण्यात आला आहे. त्यानंतर भास्कर जाधव, अनिल परब, मिलिंद नार्वेकर विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. ते आज दुपारी दोनच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.