छत्रपती संभाजीनगर : विहिर मंजूर करण्यासाठी BDO ने टक्केवारी मागितल्याने संतप्त झालेल्या सरपंचाने चक्क नोटांच्या बंडलांचा हार गळ्यात घालूत फुलंब्री पंचायत समिती कार्यालय गाठत निषेध व्यक्त केला. सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपये उधळत BDO विहिर मंजूर करण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप काल केला होता. दोन दिवसात अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर, लाचलुचपत विभागासमोर भिकमागो आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मंगेश साबळे यांनी दिला. याबाबत जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
विहिरीसाठी मागितले पैसे : फुलंब्री गेवराई पैघा येथे गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले. मंगेश साबळे असे या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत. यावेळी या सरपंचाने राज्य शासनावर टीका करत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, असे म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचाने गळ्यातील बंडलातील नोटांची उधळणही केली. दोन दिवसात न्याय मिळाला नाही तर, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय समोर कपडे काढून नग्न आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मंगेश साबळे यांनी दिला होता.
असे आहे प्रकरण : शेतकऱ्यांनी विहीर घेतल्यावर त्यानां सर्कलतर्फे तीन लाखांचे अनुदान देण्यात येते. गेवराई पैघा येथे गावामध्ये वीस विहीर घेण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रती प्रकरण साठ हजारांची मागणी करण्यात आली. पाणी महत्वाचे असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये प्रमाणे एक लाख देण्याचे मान्य केले. मात्र, वरिष्ठांना टक्केवारी द्यावी लागते, पैसे द्यावे लागतील असे सांगितल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी करत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गळ्यात पैश्यांची माळ घालत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला .त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
चौकशी समितीतर्फे चौकशी : सरपंच मंगेश साबळे यांनी केलेल्या निषेधाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासून लवकरच अहवाल द्यावा त्यानंतर दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.