औरंगाबाद - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 10 तारखेला कडक लॉकडाऊनची घोषणा केली. 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून 80 टक्के पोलीस रस्त्यावर उतरले. परंतु विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून गेल्या नऊ दिवसात पोलिसांनी तब्बल साडे चौदा लाखाच्यावर दंड वसूल केला. रविवारी मात्र हा लॉकडाऊन संपत असल्याने नागरिकांची वर्दळ पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे.
शहरात सरासरी 200 च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. प्रशासन देखील सर्व स्तरावरून रुग्ण कमी होतील यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, रुग्णांचा आकडा कमी न झाल्यामुळे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक यांनी शहराला पुन्हा लॉकडाऊनची गरज असल्याचे मत मांडले. 10 जुलै ते 18 जुलै लॉकडाऊन लावला. या लॉकडाऊन काळात नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या काळात विनाकारण फिरणाऱ्या एकूण 4 हजार 12 वाहनधारकांकडून 14 लाख 57 हजार 100 रुपये तिजोरीत जमा झाले. त्यात 1626 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच कलम 188 अंतर्गत 244 केसेस यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 12 केसेस तर साथरोग कायद्याअंतर्गत 7 केसेस केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनपासून आजपर्यंत पोलिसांनी तब्बल 1 लाख 17 हजार 214 वाहनांवर कारवाई केली. 3 कोटी 55 लाख 51 हजार 100 रुपये दंड वसूल केला तर 22 हजार 508 वाहने जप्त केली.