औरंगाबाद - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपही आक्रमक झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी वारीस यांच्या पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन करत एमआयएम विरोधी घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या भाषणावर बंदी घालण्याची मागणीही भाजपने केली आहे.
आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. या वक्तव्यानंतर इतर राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी वारिस पठाण यांच्या भाषणावर बंदी घालून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्यानंतर भाजपने औरंगाबादच्या गुलमंडी भागात आंदोलन करत वारीस पठाण आणि एमआयएम विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप पदाधिकाऱ्यांनी वारिस पठाण यांच्या पुतळ्याला पायांनी तुडवत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. पठाण यांच्या वक्तव्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी नुसत्या हिंदूंचा नव्हे तर भारतात राहणाऱ्या इतर समाजाच्या भावना दुखावत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, इतकेच नाही तर त्यांच्या भाषणावर बंदी घालावी, अशी मागणीही भाजप प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनी केली.