औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय औरंगाबाद जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारी राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रात अडचणी वाढल्या आहेत. त्यातून शेतकरी सुटलेले नाहीत. त्यामुळेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. यासाठी 2020-21 या खरीप हंगामात शंभर टक्के अनुदानावर बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी दिली.
मोफत बियाणे देताना जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने पात्र ठरवलेल्या कुटुंबीयांच्या वारसदारांना लाभ मिळणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना लाभ प्रदान करताना त्यांच्या नावाचा सातबारा आणि आठ - अ नुसार क्षेत्रफळ असल्याची खात्री केल्यावर त्याचा विहीत नमुन्यात अर्ज केल्यावर लाभ मिळणार आहे. वारस प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक करण्यात आले असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकाच वारसदार शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
संबंधित शेतकऱ्याने प्रथमता बियाण्यांची खरेदी बाजारपेठेतून अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडून करणे बंधनकारक राहील. त्यानंतर रोखीने त्यांच्या पसंतीचे बी-बियाणे खरेदी केल्यानंतर पंचायत समिती स्तरावर त्याची छाननी करण्यात येणार आहे. फक्त पात्र ठरलेल्या प्रस्तावांना अनुदानासाठी जिल्हा परिषदेकडे सादर केला जाईल. आणि त्यानुसार लाभार्थ्यांना त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार असल्याचे जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांनी सांगितले.