औरंगाबाद - कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णांवर उपचार आणि देखभाल करण्यासाठी औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या माध्यमातून मेगाभराती केली जाणार आहे. त्या संबंधी भरती प्रक्रियेची जाहिरात काढण्यात आली आहे.
सदरील भरती औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत कोविड-19 या आजाराच्या अनुषंगाने कंत्राटी पदे भरण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध पदांची जाहिरात http://www.aurangabadzp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुकांच्या मुलाखती 1 एप्रिलला घेण्यात येणार आहेत.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शासन दरबारी मोठ्या प्रमाणात उपाय योजना केल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणा सज्ज असावी, यासाठी काही पावलं उचलली जात आहेत. सर्वत्र कोरोनासाठी रुग्णालय उपलब्ध करत असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे प्रसिद्ध केलेल्या अपेक्षित शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी व शर्ती सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तरी सदर पदांसाठी थेट मुलाखत आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी थेट मुलाखतीसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयात सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
कंत्राटी तत्वावर भरावयाची पदे
१. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर
वैद्यकीय अधिकारी (MBBS )-५०, आरोग्य सेवक, महिला- १८७, आरोग्य सेवक पुरुष- ६०
२. सामान्य रुग्णालय स्तर व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय
वैद्यकीय अधिकारी (MBBS, MD MEDICINE)- ३०, वैद्यकिय अधिकारी (MBBS, MD Anaesthesia)- २०, वैद्यकीय अधिकारी (MBBS)- ७०,स्टाफ नर्स- ११०
अटी व शर्ती
१. सदर नियुक्ती ही कंत्राटे स्वरूपाची असून, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे. कोरोनाची साथ संपेपर्यंत किंवा नियुक्ती प्राधिकारी ठरवतील तोपर्यंत सदर नियुक्ती अस्तित्वात राहतील.
२. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.
३. विशेषतज्ञांनी व इतर तांत्रिक पदावरील अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र व पुनरनोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
४. सदर पदे करार पद्धतीने भरावयाचे असल्याने एकत्रित वेतना शिवाय अन्य कोणताही भत्ता लागू राहणार नाही तसेच मुलाखतीकरिता येणारे उमेदवार दैनिक व प्रवास भत्ता व इतर कोणताही भत्ता मिळणार नाही. सदर कंत्राटी पदासाठी निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे राहील.
५. विशेषतज्ञ /कर्मचारी या पदाकरिता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त विशेषतज्ञ/अधिकारी अर्ज करीत असल्यास त्यांनी शासकीय सेवेत रुजु झाल्याचा दिनांक, कार्यकाळ, पदनाम व निवृत्त झालेले वर्ष सेवानिवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन व सेवानिवृत्तीनंतर देय असलेले वेतन (पेन्शन) याबाबतची संपूर्ण माहिती अर्जामध्ये नमूद करावी.
६. सदर आवश्यक पदांच्या संख्येत मानधनामध्ये बदल होऊ शकतो.
७. सदरील पद भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहे .
८. मुलाखतीचे स्थळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे दालन
९. मुलाखतीची दिनांक ०१ एप्रिल 2020 ते दिनांक 08 एप्रिल 2020 (शासकीय सुट्ट्या वगळून) या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येतील.