औरंगाबाद - राज्यातील मंदिरे सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. या तीन दिवसांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये भक्तांनी संयम पाळल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर असेल किंवा खडकेश्वर मंदिर, या मंदिरांमध्ये नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येत आहे. इतकेच नाही तर कोरोनाचा धोका लक्षात घेता भक्तांनीदेखील थोडा संयम पाळल्याचे पाहायला मिळाले.
वेरूळ येथील घुश्मेश्वर मंदिर, बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरात रोज सरासरी पाच हजारांच्या जवळपास भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेता मंदिर आठ महिन्यानंतर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. मंदिर जरी उघडले असली तरी मात्र भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांमध्ये घृष्णेश्वर मंदिरात एक ते दीड हजार भाविकांनी दर्शन घेतले. मुख्य गाभारा बंद असल्याने मंदिराच्या आतमध्ये भाविकांना प्रवेश दिला जात नाही. मंदिरात प्रवेश करत असताना सॅनिटायझर आणि स्वच्छतेचे पालन मंदिर विश्वस्त मंडळाकडून केले जात आहे. भाविकांमध्ये देखील सुरक्षित अंतराचे पालन केले जाईल, याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. रस्त्याने प्रवास करणारा भाविकच दर्शनासाठी थांबत आहे. फक्त दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठी घट असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
शहरातील बहुतांश मंदिरांमध्ये गर्दी कमीच...
शहरातील ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर महादेव मंदिर आणि संस्थान गणपती मंदिरात मर्यादित भाविक दर्शन घेतले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या खडकेश्वर मंदिरात रोज दोन हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्देशानंतर भाविकांनी देव दर्शन घेताना शिस्तीचे पालन केल्याचे पाहायला मिळाले. शहरात असूनही मंदिरांमध्ये कमी प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले. शहरातील मंदिर सकाळी सात वाजेपासून ते रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्यात येत आहे. भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर विश्वस्तांनी नियमांचे पालन करूनच दर्शन घेता येईल अशी भूमिका घेतली आहे.
मशिदीतदेखील होत आहे नियमांचे पालन..
धार्मिक स्थळ आठ महिन्यानंतर सुरू झाली, ज्यामध्ये शहरातील मस्जिद देखील सुरू करण्यात आल्या आहेत. मुस्लिम बांधवांना नमाज पठण करत असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मस्जिद प्रमुखांनी केले आहे. ज्यामध्ये मास्क घालून नमाज पठण करणे, दहा वर्षांखालील मुलांना आणि साठ वर्षांपुढील वृद्धांना मस्जिदीत प्रवेश निषिद्ध करण्यात आला असून त्यांनी घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले असून या नियमांचे पालन जिल्ह्यात केलं जातं आहे. औरंगाबादच्या धार्मिक स्थळांबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.